मुंबई (प्रतिनिधी) : किल्लारी भूकंपावेळी खचला नाहीत. तेव्हा आता या संकटानं खचून जाऊ नका असं  आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार शेतकऱ्यांना केल. राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळ सर्वाधिक फटका हा बळीराजाला बसला आहे. ऐन कापणीला आलेली पिक उध्वस्त झाल्यामुळं जगावं ती मरावं असाच प्रश्न या पोशिंद्यापुढ उभा राहिला आहे. याच पार्श्वभूमीवर पवार आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर गेले आहेत. 

रविवारी सकाळपासूनच त्यांच्या या दौऱ्याची सुरुवात झाली. या दौऱ्यात रुपरेषेप्रमाणं ते थेट शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत. पवारांच्या या दौऱ्यात तुळजापूर, उमरगा, औसा, परांडा, उस्मानाबाद इथं ते भेट देणार असून, टप्प्याटप्पायानं त्यांनी गावागावांमध्ये जात शेतकऱ्यांशी चर्चा करत त्यांचे प्रश्न आणि अडचणी जाणून घेतल्याचं पाहायला मिळालं.

सूत्रांच्या माहितीनुसार शरद पवार यांनी या दौऱ्यात शेतकऱ्यांनी त्यांची भेट घेत अक्षरश: काही ठिकाणी त्यांच्या वाहनांच्या ताफ्याला घेराव घालत आपल्या समस्या त्यांच्या कानी घातल्याचं पाहायला मिळालं. मुख्य म्हणजे गावागावांतून निघालेल्या पवारांनीही शेतकऱ्यांसाठी वेळ काढत त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. शिवाय झालेल्या नुकसानाचा आढावा घेत परिस्थितीवर नजर टाकली. त्यांनी जातीनं या प्रकरणात लक्ष घातल्यामुळं मदत मिळण्याबाबत बळीराजाही आशावादी असल्याचं पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आता शरद पवार थेट पंतप्रधानांची भेट घेणार आहेत.