सावरवाडी (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील कसबा बीड ते महे या दरम्यानच्या भोगावती नदी पात्रातील पुलाच्या स्लॅबला तडे केल्याने पुलाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे तालुक्याच्या पश्चिम भागातील चाळीस गावांच्या दळणवळणाचा प्रश्न निर्माण होणार आहे.   

तत्कालीन माजी कृषिराज्यमंत्री श्रीपतराव बोंद्रे यांनी आमदार फंडातून करवीर तालुका पश्चिम भागातील ४० गावांच्या ग्रामीण वाहतुकीसाठी १९७१ साली कसबा बीड ते महे दरम्यान भोगावती नदी पात्रात या पुलाची उभारणी केली. या पुलावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. पुलाच्या मध्यभागी असलेला स्लॅब अत्यंत खराब झाला आहे. तडे पडू लागल्याने हा स्लॅब कोणत्याही परिस्थितीमध्ये कोसळण्याची शक्यता आहे. परंतु या पुलाच्या दुरुस्तीकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. पुलाची उंची कमी असल्यामुळे पावसाळ्यात पूल पुराच्या पाण्यात बुडतो. तरी या पुलाची तत्काळ दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांतून आणि वाहनधारकांतून होऊ लागली आहे.

पर्यायी पूल उभारण्याची मागणी..!

कसबा बीड ते महे दरम्यान भोगावती नदी पात्रात नव्याने मोठ्या पुलाची उभारणी करण्याची मागणी नागरिकांतून होऊ लागली आहे.