नाशिक : मागील काही दिवसांपासून नाशिक लोकसभा मतदारसंघातून अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे निवडणूक लढवणार, अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. यावरून आता शिवसेना शिंदे गटातील पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. छगन भुजबळ यांना लोकसभेची उमेदवारी दिल्यास बंड करू, असा इशारा शिवसैनिकांकडून देण्यात आला आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार हेमंत गोडसे हेच निवडणूक लढवणार, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. या घोषणेनंतर भाजप आणि शिंदे गटात चांगलाच कलगीतुरा रंगला होता.महायुतीतील जागावाटपावर वरिष्ठ चर्चा करत असताना श्रीकांत शिंदे यांनी कोणाला विचारून नाशिक लोकसभेची उमेदवारी जाहीर केली? असा संतप्त सवाल भाजप पदाधिकाऱ्यांनी विचारला होता. भाजपने यावेळी नाशिकच्या जागेवर उमेदवार द्यावा, अशी मागणीही भाजप पदाधिकाऱ्यांनी केली होती.

नाशिक लोकसभेतून मंत्री छगन भुजबळ यांना उमेदवारी दिल्यास आम्ही मोठं बंड करू, असा इशाराच शिवसैनिकांनी दिला आहे. भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी बेताल विधाने केल्यामुळे नाशिकमधील मराठा बांधव आक्रमक आहेत. ते भुजबळ यांच्याविरोधात प्रचार करू शकतात. यामुळे महायुतीला मोठा फटका बसू शकतो, असं शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांचं म्हटलं आहे.