कोल्हापूर (प्रतिनिधी) : ‘मी समृद्ध तर गाव समृद्ध’ या विचाराने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजनेंतर्गत (मनरेगा) गावातील विकास कामांचे नियोजन करावे. गावाच्या विकासासाठी सरपंच आणि ग्रामसेवकांनी या योजनेत लोकांचा सहभाग वाढवावा. मनरेगा योजनेतून जास्तीत जास्त कामे करुन गाव विकास कामात समृद्ध करावे, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले. ते सरपंच, ग्रामसेवकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे साधलेल्या संवादावेळी बोलत होते.
पालकमंत्री पाटील म्हणाले, मनरेगा योजना गाव पातळीवर यशस्वीपणे राबविण्यात सरपंच, ग्रामसेवकांचा मोठा सहभाग असणार आहे. यासाठी त्यांनी गावकऱ्यांपर्यंत या योजनेची माहिती पोहचवावी. वैयक्तिक लाभाच्या योजनांबरोबरच सामुदायिक लाभाच्या योजना राबविण्यावर भर द्यावा असे आवाहन केले.
यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, उपायुक्त नयना बोंदार्डे, उपजिल्हाधिकारी स्मिता कुलकर्णी, कृषी विभागाच्या उपसंचालक भाग्यश्री पवार, प्रधान सचिव नंदकुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, आदर्श गाव योजना कार्याध्यक्ष पोपटराव पवार, राज्य महिला सरपंच परिषदेच्या अध्यक्षा राणी पाटील यांच्यासह जिल्ह्यातील प्रांताधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक सहभागी झाले.