सांगोला (प्रतिनिधी) : सांगोला तालुक्यातील डिकसळ येथील आश्रमशाळेच्या मुलींच्या १४ आणि १७ वर्षे वयोगटातील संघाने व्हॉलीबॉल स्पर्धेचे अंतिम सामने मोठ्या फरकाने जिंकत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला. याच दोन्ही संघांची पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली असून, जिल्ह्यात डिकसळकरांचा दबदबा पाहावयास मिळाला आहे.

डिकसळ येथील आश्रमशाळा म्हणजे स्व. आमदार गणपतराव देशमुख यांनी गावाला दिलेली देणगी आहे. शिक्षणाबरोबरच सर्वच क्षेत्रात ही शाळा आघाडीवर असून, २०१४ सालापासून ही शाळा पुणे विभागात विविध स्पर्धेत अव्वल ठरत आहे. सोलापूर जिल्हा क्रीडा विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा आज मोहोळ येथे पार पडल्या. यामध्ये ४५ संघांनी सहभाग नोंदविला होता.

याच शाळेतील १४, १७ आणि १९ वर्षीय मुलींच्या संघांनी सांगोला तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावत जिल्हास्तरापर्यंत मजल मारली होती. आज मोहोळ येथे झालेल्या व्हॉलीबॉल स्पर्धेत १४ वर्षीय संघाने मोहोळ संघाचा सरळ सेटने पराभव करीत एकतर्फी विजय मिळवला. १७ वर्षीय मुलींच्या संघाने माळशिरस संघाचा १५-४ आणि १५-६ अशा गुणांनी विजय मिळविला. १९ वर्षीय संघाचा विजय समीप असतानाच चुकीच्या निर्णयाने फटका बसला. येथे वयाचेही अडथळे आले. असे असले तरी दोन्ही संघांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. याच सर्व यशस्वी खेळाडूंना क्रीडा शिक्षक भारत यादव, काकासाहेब करांडे, अश्विनी भूसनर यांचे मार्गदर्शन लाभले.