कोल्हापूर (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यामध्ये बोगस शौचालय दाखवून सुमारे २ कोटींचा अपहार करणाऱ्याविरोधात कारवाई करण्याच्या मागणीसाठी प्रवीण जनगोंडा पाटील यांनी जिल्हा परिषदेसमोर आज (शुक्रवारी) अर्धनग्न अवस्थेत आंदोलन केले. दरम्यान, पाटील आणि पोलिसांची यावेळी झटापट झाली. त्यामुळे जि.प.च्या आवारात काहीवेळ तणावाचे वातावरण पसरले होते.   

अपहार  प्रकारणातील दोषींवर कारवाई करण्याची मागणी  प्रवीण पाटील यांनी वेळोवेळी  केली. परंतु याकडे प्रशासनाने  कानाडोळा केला. त्यामुळे  जिल्हा परिषदेसमोर शुक्रवारी (दि.११) आत्मदहन करण्याचा इशारा पाटील यांनी दिला होता. त्यामुळे गुरूवारपासून पोलीस पाटील यांच्या  मागावर होते. त्यांच्या घरी आणि जिल्हा परिषदेच्या परिसरात  पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तरीही पोलिसांना चकवा देऊन पाटील हे जिल्हा परिषदेसमोर हजर झाले आणि अर्धनग्न अवस्थेत आंदोलनाला बसले. यावेळी पोलीस आणि पाटील यांच्यामध्ये झटपट झाली.