नवी दिली (वृत्तसंस्था) : महागाईच्या झळा पोहोचत असताना केंद्र सरकारने जीएसटीच्या कक्षेत नसणाऱ्या गोष्टींवर जीएसटी आकारायचा निर्णय घेतल्यामुळे सर्वसामान्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. त्यामुळे आता जनतेच्या रोषाची दखल घेत आता केंद्र सरकारने काही वस्तूंवर जीएसटी आकारण्याचा निर्णय मागे घेतला आहे.

सुट्या डाळी, गहू, मोहरी, ओट्स, मका, तांदूळ, पीठ, रवा, बेसन, दही आणि लस्सी यावर आता जीएसटी रद्द करण्यात आला असून, या पदार्थांवर आता जीएसटी लागणार नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. केंद्र सरकारकडून नुकताच सुट्या धान्य आणि खाद्यपदार्थांवर ५  टक्के जीएसटी आकारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याची अंमलबजावणी १८ जुलैपासून करण्यात आली आहे. सुट्या खाद्य पदार्थांवरील जीएसटी आता मागे घेण्यात आला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी याबाबतची घोषणा केली आहे.

ब्रँडेड वस्तूंवर कर भरणाऱ्या पुरवठादार आणि उद्योग संघटनांनी याला विरोध केला होता. अशा प्रकारचा गैरवापर रोखण्यासाठी त्यांनी सर्व पॅकेज केलेल्या वस्तूंवर समान रीतीने जीएसटी आकारण्यासाठी सरकारला पत्र लिहिले होते. फिटमेंट समितीने अनेक बैठकांमध्ये या समस्येचा विचार केला होता. तसेच गैरवापर टाळण्यासाठी कार्यपद्धती बदलण्यासाठी काही शिफारसीही केल्या होत्या, असेही त्या म्हणाल्या.

जर या वस्तू उघड्यावर विकल्या गेल्या आणि प्री-पॅकेज केलेले किंवा प्री-लेबल केलेले नसतील, तर त्यांच्यावर कोणताही जीएसटी लागणार नाही. जीएसटी परिषदेने घेतलेला हा निर्णय सर्वानुमते घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीला सर्व राज्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. गैर-भाजपशासित पंजाब, छत्तीसगड, राजस्थान, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, तेलंगणा, केरळ या राज्यांसह सर्व राज्ये या निर्णयाशी सहमत आहेत, असेही निर्मला सीतारमन यांनी स्पष्ट केले.