कोल्हापूर ( प्रतिनिधी ) शेतकऱ्यांना नवनवीन शेतीविषयक तंत्रज्ञानाची माहिती एकाच छताखाली मिळावी या उद्देशाने डी. वाय. पाटील ग्रुप, महाराष्ट्र शासन कृषी विभाग, आत्मा कोल्हापूर, कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने पश्चिम महाराष्ट्रातील भव्य “सतेज कृषी व पशुपक्षी प्रदर्शन’आयोजित करण्यात येते. यावर्षीचे हे पाचवे प्रदर्शन 22 ते 25 डिसेंबर 202३ या कालावधीत तपोवन मैदान येथे होणार आहे.


याबाबत अधिक माहिती देताना आमदार सतेज पाटील म्हणाले, चार दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनाचे उदघाटन 22 डिसेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता होणार आहे. असून देश – विदेशातील विविध नामांकित कंपन्यांचा सहभाग आहे. याचबरोबर पशुपक्षी दालन, शेतकऱ्यांना तज्ञांकडून मार्गदर्शन, विविध कंपन्यांची उत्पादने व शेतकऱ्यांसाठी नवनवीन आधुनिक तंत्रज्ञान, मशिनरी यांची माहिती एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे.
यामध्ये तांदूळ महोत्सव, धान्य महोत्सव, 250

पेक्षा अधिक कृषी कंपन्यांचा सहभाग, 200 पेक्षा अधिक पशु-पक्ष्यांचा सहभाग, शेती विषयक तज्ञांचे मार्गदर्शन व चर्चासत्र, विविध शेती अवजारे, बि-बियाणे खते आदींची माहिती, फुलांचे प्रदर्शन व विक्री (पुष्पप्रदर्शन) विविध सांस्कृतिक कार्यक्रम व बचत गटांचे मोफत स्टॉल, लहान मुलांसाठी अम्युझमेंट पार्क आदींचा समावेश आहे.

प्रदर्शनामध्ये पीक स्पर्धा, पुष्प स्पर्धा, खाद्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली जाणार आहे. तीन दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. काही शेतकऱ्यांना शेतीभूषण पुरस्कार, आदर्श शेतकरी पुरस्कार आणि कृषी विभागाच्या वतीने उत्कृष्ट शेतकऱ्यांचा आणि खाद्य स्टॉल स्पर्धा पशुस्पर्धांची बक्षीसही दिले जाणार आहेत. आत्माच्या वतीने शेतकरी गट कंपन्यांची माहिती दिली जाणार आहे.