कोल्हापूर (प्रतिनिधी) : दुबई येथे धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त होणाऱ्या ‘दुबई विचार महोत्सव २०२२’ या आंतरराष्ट्रीय संमेलनामध्ये गिरीश फोंडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आर्थिक विचार यावर आपले विचार मांडणार आहेत. त्याकरिता ते नुकतेच दुबईला रवाना झाले आहेत. ३० ऑक्टोबर रोजी होणाऱ्या संमेलनाचे उद्घाटन हे पुरोगामी विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे करणार आहेत तर संमेलनाचे अध्यक्ष हे लेखक उत्तम कांबळे असणार आहेत.

या आंतरराष्ट्रीय संमेलनामध्ये विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या परिसंवादात गिरीश फोंडे हे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आर्थिक विचार’ याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. गौतम बुद्ध, डॉ. आंबेडकर यांच्याशी निगडित इतरही पैलूंवर चर्चा केली जाणार आहे. महाराष्ट्रातून याकरिता ४० पेक्षा जास्त लेखक, प्राध्यापक, सामाजिक कार्यकर्ते सहभागी होण्यासाठी दुबईला रवाना झाले आहेत.

आंबेडकर इंटरनॅशनल मिशन व फुले शाहू आंबेडकर विचार प्रसारक मंडळ, भोर यांच्या संयुक्त विद्यमाने या आंतरराष्ट्रीय संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. नायजेरियातील ह्यूमन कॅपिटल कन्सल्टंटचे डॉ. ओरोनाना पॉल व संयुक्त अरब अमिरात चॅनेल डिलिव्हरी मॅनेजरच्या प्रीती वराडे यांच्या प्रमुख यांचा विशेष सन्मान या संमेलनात होणार आहे. गिरीश फोंडे यांनी यापूर्वी  वर्ल्ड फेडरेशन ऑफ डेमोक्रॅटिक यूथचे जागतिक उपाध्यक्ष व इतर पदांची जबाबदारी सांभाळत २० हून अधिक देशांमध्ये विविध अभ्यास दौरे परिषद परिसंवाद यामध्ये सहभाग घेतला आहे.