कागल (प्रतिनिधी) : समरजितसिंह घाटगे प्रत्येक गोष्टीसाठी शाहू ग्रुपच्या कर्मचाऱ्यांना वेठीस धरत आहेत. त्यांचे डिजिटल बोर्डही कर्मचाऱ्यांचा सक्तीच्या वर्गणीतूनच उभारले जात आहेत, असा सणसणीत आरोप गोकुळ दूध संघाचे ज्येष्ठ संचालक युवराज पाटील यांनी. कागलमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.

पाटील म्हणाले, नेतृत्व हे विधायक कामातून निर्माण होत असते. घाटगे मात्र मोठमोठे डिजिटल बोर्ड उभे करुन नेतृत्व सिद्ध करायच्या नादाला लागले आहेत. हे बोर्ड त्यांनी स्वतःच्या खर्चातून करायलाही काही हरकत नाही. या डिजिटल बोर्डाचा खर्च ते काबाडकष्ट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर का टाकताहेत तेच समजत नाही. आ. मुश्रीफ यांनी जलजीवन योजनेच्या माध्यमातून ३०० कोटींहून अधिक निधी कागल विधानसभा मतदारसंघासाठी खेचून आणला आहे. शेतकऱ्यांच्या ५० हजार रुपये प्रोत्साहन लाभ अनुदानासाठीही त्यांनी केलेला पाठपुरावा जग जाहीर आहे, असे असताना अशा न केलेल्या कामांचे श्रेय घेण्यासाठी समरजितसिंह घाटगे हे मोठमोठे बोर्ड कर्मचाऱ्यांच्या वर्गणीमधून उभे करीत आहेत.

यावेळी ज्येष्ठ नगरसेवक चंद्रकांत गवळी, माजी नगराध्यक्ष नवल बोते, जिल्हा परिषद सदस्य मनोजभाऊ फराकटे, कागल तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विकास पाटील, कागल शहराध्यक्ष संजय चितारी, नारायण पाटील, प्रवीण काळबर, दत्ता पाटील, के. पी. पिष्टे, सुनील माने, सुनील माळी, प्रवीण सोनुले आदी उपस्थित होते.