कोल्हापूर (प्रतिनिधी) : शेतकरी, शेतमजूर, मच्छीमार, फळ बागायत शेतकरी, कामगार यांना एकत्रित करून दक्षिण भारतातील चळवळ मजबूत करण्यासाठी राष्ट्र सेवा दलचे अध्यक्ष भाषातज्ञ गणेश देवी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांची शिरोळ निवासस्थानी भेट घेतली.

महात्मा फुले यांनी २४ सप्टेंबर रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना करून देशामध्ये मजबूत चळवळ उभी केली. याचदिवसाचे औचित्य साधून राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष गणेश देवी यांनी दक्षिण भारतातील शेतकरी व डाव्या विचारसरणीच्या लोकांची भेटी घेत आहेत. कोल्हापूर जिल्ह्याच्या दौ-यावर असताना त्यांनी राजू शेट्टी यांची भेट घेऊन विविध विषयावर चर्चा केली. यावेळी त्यांनी देशामध्ये शेतकरी, शेतमजूर, कामगार, मच्छीमार या सर्वांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी एकत्रित पणे लढा उभा करण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले.

यावेळी राजू शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेबरोबरच देशातील २६० शेतकरी संघटनेचे नेतृत्व करणाऱ्या अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या सहकार्याने हा लढा देशभर उभा करण्याची भूमिका मांडली.