कोल्हापूर (प्रतिनिधी) : येथील न्यू कॉलेजचे माजी ग्रंथपाल पी. सी. पाटील (वय ८०) यांचे शनिवारी अल्पशा आजाराने निधन झाले. शिवाजी विद्यापीठातील अधिसभा सदस्यसह चंदगड तालुक्यातील विविध शैक्षणिक संस्थांवर त्यांनी काम केले होते. ते उजळाईवाडी येथे राहत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

गेली ४० वर्षे शेकडो विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक यांना सहकार्य करणाऱ्या पी. सी. पाटील यांनी न्यू कॉलेजमध्ये ३२ वर्षे, तर यापूर्वी विवेकानंद कॉलेज, राजे रामराव कॉलेज, जत येथे अनुक्रमे ७ व एक वर्ष ग्रंथपाल म्हणून काम केले आहे. बी.ए., बी.लिब. सायन्स (ग्रंथशास्त्र), एम.ए. (मराठी स्पेशल), एम.ए. (अर्थशास्त्र स्पेशल), एम.लिब.एससी (ग्रंथालय शास्त्र) असे शिक्षण झालेले पी. सी. पाटील हे विविध शैक्षणिक संस्थांवर पदाधिकारी म्हणून कार्यरत होते.

कोवाडच्या सर्वोदय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, शिवणगेच्या नरसिंगराव पाटील प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष, कालकुंद्री येथील खेडूत शिक्षण मंडळाचे संचालक व जनसंपर्क अधिकारी, खेडूत शिक्षण मंडळ माजी विद्यार्थी सेवा संघ, कोवाडच्या रणजित देसाई सार्वजनिक ग्रंथालयाचे संचालक, कोल्हापूरच्या राधेय शिक्षण विकास मंडळाचे आणि कोल्हापुरातील श्रीमान योगी रणजित देसाई सार्वजनिक ग्रंथालयाचे सचिव आणि राजर्षी शाहू छत्रपती कृतज्ञता प्रतिष्ठानचे सहसचिव म्हणून काम केले आहे.

पाटील हे शिवाजी विद्यापीठ अंतर्गत आणि कोल्हापूर जिल्हा ग्रंथालय संघ संचालित ग्रंथालय व व्यवस्थापन कोर्सच्या अध्यापनाचे काम करीत होते. त्यांनी शिवाजी विद्यापीठमध्ये सिनेटर, जिल्हा बहि:शाला शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, शिवाय अर्थ, हिशेब, एनसीसी अॅँड एनएसएस समिती व अॅडव्हॉक बोर्ड ऑफ लायब्ररी अॅँड इन्फर्मेशन सायन्सचे सदस्य म्हणून काम केले आहे. आजपर्यत त्यांनी विविध ठिकाणी वेगवेगळ्या विषयावर २०० हून अधिक व्याख्याने दिली आहेत. तसेच त्यांनी किमान ५० ते ६० व्यक्तींना निरपेक्ष वृत्तीने कोणताही मोबदला न घेता नोकरी वा सेवा करण्याची संधी प्राप्त करून दिली होती.