कोल्हापूर (प्रतिनिधी) : शहरातील फुटबॉल स्पर्धेचा हंगाम येत्या चार डिसेंबरपासून सुरु होत आहे. या हंगामासाठी संघांकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. कतारमध्ये सुरु असलेल्या फिफा वर्ल्डकपमुळे कोल्हापूर फुटबॉलमय झाल्याने स्थानिक खेळाडू आणि शौकिनांचा जोश वाढला आहे.

शाहू स्टेडियमवर फुटबॉल स्पर्धेची जय्यत तयारी सुरु आहे. चालू हंगामासाठी १६ संघ मैदानात उतरणार आहेत. सीनियर सुपर ८ व सुपर ८ अशा दोन गटांतर्गत दररोज २ असे एकूण ५६ सामने होतील. चालू हंगामासाठी हंगामासाठी ३४८ खेळाडू करारबद्ध झाले आहेत. यामध्ये २४ परदेशी खेळाडूंचा समावेश आहे.

सहा महिन्यांपर्यंत चालणाऱ्या या मोसमात अनेक परदेशी खेळाडू कोल्हापुरात दाखल झाले आहेत. गेल्या दोन वर्षांत निर्बंधांमुळे कोल्हापूर क्लबने एकाही परदेशी खेळाडूला संघात घेतले नव्हते. कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन कोल्हापूरच्या बाहेरील जास्तीत जास्त तीन खेळाडूंना प्रवेश देण्यास परवानगी देते. यापैकी दोन परदेशी असू शकतात. साखळी सामने कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन मार्फत सुरुवातीला खेळवले जातील आणि नंतर पात्र संघ बाद फेरीत लढणार आहेत.