कोल्हापूर (प्रतिनिधी) : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचाराने प्रेरित होऊन तिसंगी, ता. गगनबावडा ग्रामपंचायतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विधवा महिलांच्या हस्ते ध्वजारोहण आणि सर्व विधवा महिलांमधून एक दिवसाचा सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यत्वाचा बहुमान देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती सरपंच बंकट थोडगे यांनी पत्राद्वारे दिली आहे.

हेरवाड ग्रामपंचायतीने विधवा महिलांच्या सन्मानार्थ अनिष्ट प्रथा निर्मूलनाचा क्रांतिकारी निर्णय घेऊन समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. गगनबावडा तालुक्यात शिव-शाहू-फुले-अण्णा भाऊ साठे विचार मंचाच्या वतीने अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात. तिसंगी ग्रामपंचायतीने १५ ऑगस्ट रोजी ध्वजारोहणासह एकदिवसीय सरपंच उपसरपंच व सदस्यत्वाचा बहुमान विधवा महिलांना देऊन त्यांचा सन्मान करण्याचे ठरविले आहे.