मुंबई/प्रतिनिधी : बृहन्मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्यासह अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्तांना केंद्रीय निवडणूक आयोगाने हटवलं आहे. निवडणूक आयोगाने गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या सहा राज्यांतील सचिवांना हटवले आहे. लोकसभेच्या निवडणुकांची तारीख जाहीर केल्यानंतर निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, निवडणूक आयोगाने आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याबरोबर मिझोराम आणि हिमाचल प्रदेशमधील GAD चे सचिव, जे सध्या संबंधित मुख्यमंत्री कार्यालयात जबाबदारी सांभाळत आहेत, त्यांना देखील ECI ने काढून हटवले आहे. इक्बाल सिंह चहल हे महाराष्ट्र केडरचे 1989 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी महाराष्ट्र शासन आणि राष्ट्रीय स्तरावर विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.

निवडणूक आयोगाने अनेक राज्यांमधील उच्चपदस्थ ब्युरोक्रॅट्सच्या बदलीचे आदेश दिले आहेत. गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या सहा राज्यांतील सचिवांना निवडणूक आयोगाने हटवले आहे. मिझोराम आणि हिमाचल प्रदेशमधील सामान्य प्रशासकीय विभागाच्या सचिवांनाही हटवण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या तारखांच्या घोषणेनंतर आयोगाने महाराष्ट्र सरकारला पत्र ज्या अधिकाऱ्यांनी तीन वर्षे पूर्ण केली आहेत किंवा त्यांच्या मूळ गावी तैनात आहेत त्यांची बदली करण्यात यावी, असे सांगितले होते.

मात्र, सनदी अधिकाऱ्यांना निवडणूक कर्तव्यात प्रत्यक्ष सहभाग नसल्याच्या आधारे सूट देण्यात आल्याचे समजते. मात्र, सनदी अधिकाऱ्यांनाही हटवण्यात यावे, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले. सरकारने निवडणूक आयोगाकडे जात सनदी अधिकारी कायम ठेवावेत, ते मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये गुंतलेले आहेत जे वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहेत असे म्हटले होते. मात्र, हा प्रस्ताव फेटाळला गेल्याने राज्य सरकारला झटका बसला आहे.