हातकणंगले (प्रतिनिधी)  : महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या  माध्यमातून संचारबंदी दरम्यान जिल्ह्यात राबविलेल्या कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी  हातकणंगले पोलिसांच्या कामगिरीचे विशेष कौतुक केले. तसेच प्रभावीपणे कायदा सुव्यवस्थेची अंमलबजावणी करा. कामात  कसूर करणाऱ्यांची गय करू नका, अशा सूचना पोलीस दलाला दिल्या.

दरम्यान, पोलीस उपाधीक्षक साहिल झरकर यांच्या मार्गदर्शनाखाली हातकणंगले पोलिसांनी दोन नंबर धंदेवाल्यांच्या विरोधात तीव्र मोहीम उघडली. मुडशिंगी, माणगाव वाडी, हेरले, रुई, हातकणंगले या ठिकाणी धाडी टाकून अवैध  देशीविदेशी बनावटीचे दारूचे साठे जप्त करून कारवाई केली. तर अनेकांना गजाआड केले. गावठी दारू तयार करण्यासाठी आणलेले लाखो रुपयांचे रसायन नष्ट केले.

संचारबंदीत बेलगाम फिरणाऱ्या वाहनधारकांवर ९२३ गुन्हे दाखल केले आहेत.  २६ वाहने जप्त करून ३ लाखांवर दंड वसूल केला आहे.  या प्रभावी कामगिरीचे शैलेश बलकवडे यांनी विशेष कौतुक केले आहे. पुढील १५ दिवसांत कायदा व सुव्यवस्थेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आपण उभे राहू, असा विश्वास पोलीस दलाला शैलेश बलकवडे यांनी दिला आहे.