कोल्हापूर (प्रतिनिधी) : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे सहयोगी प्रा. डॉ. अभिनंदन पाटील यांना ‘इंडिया एक्सलन्स अवॉर्ड-२०२२’ ने सन्मानित करण्यात आले. बेंगळुरू येथील हॉटेल ताज येथे झालेल्या कार्यक्रमात अभिनेत्री अम्रीता रॉय हिच्या हस्ते त्यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

संशोधन, चित्रपट, प्रसारमाध्यमे आणि ब्रँडिंग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा ‘ब्लाईंडविक’ या संस्थेकडून इंडिया एक्सलन्स अवॉर्डने सन्मान केला जातो. डॉ. अभिनंदन पाटील हे गेली ११ वर्षे संशोधन व समुपदेशन क्षेत्रात कार्यरत आहेत. मोबाईल व टीव्हीच्या व्यसनापासून मुलांना मुक्त करण्यासाठी ते समुपदेशन करतात. त्यासाठी पेटंटेड प्रॉडक्टचा वापर करून अभ्यास व परीक्षेची भीती दूर करून एकाग्रता वाढविण्यासाठी ते मदत करतात. कर्करोग निदान व उपचार याबाबतही ते काम करत आहे. या क्षेत्रातील संशोधक म्हणून त्यांची ओळख आहे. डॉ. अभिनंदन पाटील यांच्या या कामाची दखल घेऊन ‘यंग इंस्पायरिंग इंटरनॅशनल एज्युएकेटर अँड कॅन्सर सायंटिस्ट ‘ म्हणून त्यांना गौरविण्यात आले.

डॉ. पाटील यांनी बी. फार्म, एम. फार्म, पीएचडी आणि पोस्ट डॉक्टरेट अभ्यासक्रमात गोल्ड मेडल मिळवण्याचा विश्वविक्रम केला आहे. या विक्रमाची नोंद ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ व ‘इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये झाली आहे. डॉ. अभिनंदन पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल कुलपती डॉ. संजय डी पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ आर. के. मुदगल, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी त्यांचे अभिनंदन केले.