नागपूर : प्रहारचे संघटनेचे आमदार बच्चू कडू यांचा अपघात झाला की, हा सत्ताधाऱ्यांनी केलेला घातपात आहे, असा सवाल गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. या प्रकरणाची चौकशी करा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

अमरावतीमध्ये रस्ता ओलांडत असताना बच्चू कडू यांना एका दुचाकीस्वाराने भीषण धडक दिली. त्यामुळे बच्चू कडू रस्त्याच्या दुभाजकावर आदळले. त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. उजव्या पायालाही गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर बच्चू कडू यांना तातडीने अमरावतीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर सध्या त्यांच्यावर नागपूरमध्ये एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अमोल मिटकरी यांनी बच्चू कडू यांच्या अपघाताबद्दल संशय व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, मंत्रिमंडळ विस्तारावर बच्चू कडू नाराज होते. त्यांनी आपला नाराजी व्यक्तही केली होती. विस्तार करता येत नसेल तर करू नका, पण खोटे बोलू नका, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुनावले होते. त्यानंतर बच्चू कडू यांचा अपघात झाला. हा अपघात झाला की, याच लोकांनी घडवून आणला? याची चौकशी करावी, अशी मागणी मिटकरी यांनी केली आहे. राज्यात असे राजकारण होत असेल, तर महाराष्ट्राची जनता तुम्हाला २०२४ मध्ये सत्तेतून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.