कोल्हापूर (प्रतिनिधी) : चांगली नोकरी लागली आणि लग्न झाल्यानंतर राणी आली म्हणून आई वडिलांना विसरू नका, अन्यथा कायदा अंमलबजावणी करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा दम आज (सोमवार) ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला. जिल्हापरिषद अनुकंपा भरतीमधील नेमणूक पत्रे वाटण्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील ही उपस्थित होते.

शासकीय विश्रामगृह येथे अनुकंपा भरतीमधील ५० जणांना नियुक्तीपत्र देण्यात आली. या कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री सतेज पाटील यांनीही नियुक्तीपत्र देण्याच्या आधी ‘ज्या आईच कुंकू पुसलंय त्या आईला उघड्यावर टाकू नका’, असे सांगितले. याचीच री ओढून मुश्रीफ यांनी नोकरी लागली मग लग्न होईल आणि राणी येईल त्यानंतर आई-वडिलांना विसरू नका असे सुनावले. याचबरोबर ही नोकरी त्यांच्यामुळे लागली आहे हे त्यांनी विसरू नये असेही बोलून दाखविले. आई-वडिलांना सांभाळण्यासाठीच्या कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याची वेळ आणू नका, असे मुश्रीफ यांनी सुनावले.

जिल्हापरिषदेमधील १२२ अर्जांपैकी ५० उमेदवारांना आज अनुकंपाखाली नेमणूकपत्र देण्याचा कार्यक्रम पार पडला. यावेळी जिल्हापरिषद अध्यक्ष बजरंग पाटील, उपाध्यक्ष सतीश पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल आदी उपस्थित होते.