औरंगाबाद (प्रतिनिधी) : भाजपला सोडचिठ्ठी देऊन नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या जयसिंगराव गायकवाड यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. ‘चंद्रकांत पाटील यांनी कधी आंदोलन केले आहे का, त्यांना तुरुंग आणि पोलीस कस्टडी काय असते हे माहिती आहे का?’, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

ते औरंगाबादमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर चांगलीच आगपाखड केली. ते म्हणाले, मी १५ वर्षे संघाचा प्रचारक होतो. आम्ही अनेक दिवस जेलमध्ये काढलेत. पाटील यांनी कधी आंदोलन केलेले नाही. त्यांना पोलीस कस्टडी माहिती नाही.

सध्या भाजपमध्ये सामूहिक नेतृत्त्वाची प्रथा संपुष्टात आली आहे. पक्षातील बहुजन नेतृत्त्व संपवण्याचा घाट घातला जात आहे. एकनाथ खडसे, विनोद तावडे आणि रावसाहेब दानवे यांच्यासारख्या नेत्यांना दाबण्याचा प्रयत्न झाला आहे. आगामी काळात आपण मराठवाड्यात राष्ट्रवादी काँग्रेस वाढवण्यासाठी जीवाचे रान करू. माझ्यासारख्या राजकीय आखाड्यातील घोड्याला भाजपने १२ वर्षे खुंटीला बांधून ठेवले. तेव्हापासून मी अपमान सहन करत आहे. पूर्ण विचाराअंती मी पक्ष सोडला आहे.