नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बिहार विधानसभा निवडणुकीसंबंधी शिवसेना खासदार धैर्यशील माने यांनी भाजपवर घणाघाती टीका केली आहे. बिहारमध्ये नितीश कुमार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभव होईल. याचे वाटेकरी नितीश आणि मोदी असतील. असे ठाम मत माने यांनी व्यक्त केले. ते दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते.

ते म्हणाले, बिहार निवडणुकीमध्ये सुशांत सिंग राजपूत हा मुद्दाच नव्हता. परंतु, भाजपने हा मुद्दा बनवला. आता महाराष्ट्रातून बिहारमध्ये परिवर्तनची लाट गेली आहे. तेजस्वी यादव यांच्या रूपाने बिहारमध्ये परिवर्तन आले. आता संपुर्ण देशात परिवर्तन येईल. महाराष्ट्रामध्ये कोणत्याही व्यक्तीवर अन्याय झाला नाही तर न्याय मिळवून दिला जातो. बिहारमध्येही असेच होणार आहे. भाजपने छोट्या पक्षाला सोडले परंतु काँग्रेस पक्षाने सर्व छोट्या पक्षांना सोबत घेतले. भविष्यात काँग्रेस पक्ष मोठ्या आघाडीने वाढणार आहे. राहुल गांधी यांच्यावर अनेकांचा विश्वास आहे.