कोल्हापूर (प्रतिनिधी) : येथील अंबाबाई मंदिरातील नवग्रह मंदिरामधील चबुतऱ्यावरील होळकरची राजमुद्रा खोडून हेतूपुरस्सर मंदिराचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्या काही प्रवृत्तींकडून झाला आहे. या प्रवृत्तींविरुद्ध कायदेशीर कारवाई करून ती राजमुद्रा पूर्ववत तयार करून बसवावी, अन्यथा या प्रश्नी आंदोलन छेडण्याचा इशारा मल्हार सेनेसह विविध संघटनांनी दिला आहे.

अंबाबाई मंदिरात अनेक शिलालेख व बहुजनांची प्रतिके असणारे अनेक संदर्भ आढळतात. काही मंडळीनी हेतूपुरस्सररीत्या गेल्या काही वर्षात यासंदर्भातील प्रतीके नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. या ठिकाणी २४ तास बंदोबस्त व भक्तजणांचा वावर असतानाही असा प्रकार होणे, ही घटना निंदनीय आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचा कोल्हापूर नगरीशी असणारा ऋणानुबंध पाहता त्यांनी अनेक ठिकाणी मंदिराचे जीर्णोध्दार केले आहेत. त्यानुसार नवग्रह मंदिराच्या चबुतऱ्यावर होळकरांची राजमुद्रा बसवली आहे. याचा बांधकाम खर्चही अहिल्यादेवी होळकर यांच्या हुजूर खासगीतून झाला आहे.

ही राजमुद्रा पुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजकंटकांचा मल्हार सेनेसह संघटनांनी निषेध केला आहे. संबंधितांवर कारवाईच्या मागणीचे निवेदन मल्हार सेनेचे सरसेनापती बबनराव रानगे, मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळिक, धनगर समाज महासंघाचे जिल्हा अध्यक्ष राघू हजारे, बाबूराव बोडके, भगवान हराळे, नवनाथ गावडे, धोंडिराम कात्रट, आण्णासो कोळेकर, अवधूत पाटील, मदन डाळे, बबल फाले, लिंबाजी हजारे, सोमाजी वाघमोडे, आनंदा सिध्द, बाबूराव गावंडे, सुनील बोडेकर, सुरेश हराळे यांनी जिल्हाधिकारी तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष राहुल रेखावार यांना दिले आहे.