मुंबई : एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामधून लवकरच भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार अशा चर्चा सुरु असताना आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी जीवे मारण्याची धमकीचे फोन आल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ खडसे यांना बुधवारी सकाळच्या सुमारास जवळपास चार ते पाच धमकीचे फोन आल्याची माहिती मिळत आहे. छोटा शकील गँगकडून ही जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती आहे.

एकनाथ खडसे यांना जीवे मारण्याची धमकी देणारे फोन चार ते पाचवेळा आले असून या फोनपैकी एक फोन अमेरिकेमधून आल्याचेही एकनाथ खडसे यांनी सांगितले. यानंतर एकनाथ खडसे यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. एकनाथ खडसे यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती आहे.

छोटा शकील आणि दाऊद इब्राहिम तुम्हाला मारणार आहे, असे धमकी देणाऱ्याने पहिल्यांदा फोनवरुन सांगितले. त्यानंतर खडसे यांनी तो प्रकार गंभीरतेने घेतला नाही. त्यानंतर दुसऱ्या फोनवरुन पुन्हा फोन आला की तुम्हाला सांगितल्यानंतर तुम्ही काहीच केले नाही. तुम्हाला ही लोक मारणार आहेत. चार ते पाच वेळा असे फोन आल्यानंतर एकनाथ खडसे यांनी तक्रार दाखल केली आहे. हे फोन अमेरिका आणि उत्तर प्रदेशातून लखनऊमधून आल्याचे स्पष्ट झाले आहे.

छोटा शकीलचे नाव सांगत आम्ही तुम्हाला मारु, अशी धमकी फोनवरुन देण्यात आल्याचे एकनाथ खडसे यांनी माध्यमांना सांगितले. तसेच फोन आल्याचे क्रमांक ट्रेस केले असता त्यातील एक फोन अमेरिकेवरुन आल्याचे दिसते असे सांगत या धमकीमागे राजकीय संबंध नसल्याचे आपल्याला वाटते. तसेच पोलिस तपासातून यातील तथ्य बाहेर येईल, असे एकनाथ खडसे यांनी सांगितले आहे. याबाबत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालावे, असेही खडसे म्हणाले.

एकनाथ खडसे स्वगृही परतणार
एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामधून लवकरच भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. यासंदर्भात एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपूर्वीच प्रतिक्रिया देत आपण लवकरच पुन्हा भारतीय जनता पक्षात जाणार असल्याचे सांगितले होते. यासंदर्भात एकनाथ खडसे यांनी भाजपाच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांच्या भेटीदेखील घेतल्या होत्या.