कोल्हापूर (प्रतिनिधी) : भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभाग प्रायोजित अत्याधुनिक विश्लेषणात्मक उपकरण प्रशिक्षण कार्यशाळा शिवाजी विद्यापीठातील सैफ डीएसटी-सीएफसी विभागात दि. १ ते ७ नोव्हेंबर दरम्यान झाली. स्टार्ट अप इंडिया आणि स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा अंतर्गत देशातील वेगवेगळ्या नामांकित संस्थेतून आलेल्या संशोधकांना या विभागामधील अत्याधुनिक उपकरणांची प्रत्यक्ष प्रात्यक्षिके देण्यात आली. देशातील नामवंत प्राध्यापक, वैज्ञानिक यांचे मार्गदर्शन मिळाले.

या प्रशिक्षणाच्या शेवटच्या दिवशी प्रा. डी. एस. भांगे यांनी एक्स रे डीफ्रॅक्शन या उपकरणाविषयी सविस्तर माहिती दिली. शेवटचे पुष्प गुंफताना बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स पिलानी, गोवा कॅम्पसचे प्रा. सुनील भांड यांनी ॲटॉमिक फोर्स मायक्रोस्कोपी या उपकरणावर मोलाचे मार्गदर्शन केले. या व्याख्यानमालेतून श्रीनगर, दिल्ली, बंगलोर, गोवा, मुंबई, पुणे अशा, देशातील विविध भागातून एकूण १४ तज्ज्ञांची व्याख्याने सहभागीना ऐकायला मिळाली. कार्यशाळेसाठी आलेल्या संशोधक विद्यार्थ्यांनी प्रशिक्षणाचा आम्हाला चांगल्या प्रकारे संशोधनासाठी उपयोग होईल असे उद्गार काढले.

शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. पी. एस. पाटील हे यांनी समारोप कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषविले. मुख्य अतिथी म्हणून गोव्याचे प्रा. सुनील भांड उपस्थित होते. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च, भोपाळचे संचालक प्रा. सिवा उमापती हे ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते. डॉ. सी. व्ही. रमण यांच्या जयंती दिवशी ज्यांनी रमण इफेक्टवर खूप काम केले आहे, असे प्रा. सिवा उमापती हे प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी विद्यापीठाला लाभले हे आपले भाग्य आहे, असे प्रा. सोनकवडे यांनी नमूद केले.

डॉ. रमण यांनी प्रतिकूल परिस्थितीत इतका महत्त्वाचा शोध लावला, आता तर आपण तांत्रिकदृष्ट्या संशोधन करण्यास सक्षम आहोत, म्हणूनच विद्वानांनी वैज्ञानिक समुदायासाठी साधने स्थापित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अशी अपेक्षा प्रमुख पाहुणे प्रा. सिवा उमापती यांनी व्यक्त केली. ‘हा जरी कार्यक्रमाचा शेवट असला, तरी एका नव्या ऊर्जेची सुरुवात आहे’ असे मत प्रा. भांड यांनी व्यक्त केले. ‘शास्त्रीय पद्धतीने विचार करून आपल्या नमुन्यासाठी योग्य ते उपकरण निवडून नवीन अत्याधुनिक उपकरणांची गरज ओळखली पाहिजे,’ असे प्रा. पाटील यांनी नमूद केले.

स्तुति टीममध्ये असणारे डॉ. टी. डी. डोंगळे, डॉ. के. डी. पवार, डॉ. मकसूद वाईकर, आदिती गर्गे, अजित कांबळे, विजया इंगळे, सुप्रिया साठे, गायत्री पवार यांना कार्यशाळा पार पाडण्यासाठी प्रा. सोनकवडे यांचे मार्गदर्शन लाभले. गेल्या आठ महिन्यापासून ही स्तुतिच्या टीमने १० वेगवेगळ्या ठिकाणी असे कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडले आहेत.