नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उद्या बुधवारपासून सुप्रीम कोर्टात सरकारच्या भवितव्याचा फैसला कऱणारी सुनावणी होणार आहे. त्याच अस्वस्थेतून मुख्यमंत्री दिल्लीत आले आहेत. काही प्रमुख नेत्यांना भेटत आहेत; पण कोर्टावर दबाव आणण्याचा प्रयत्न जरी झाला तरी आजही सुप्रीम कोर्टात रामशास्त्री बाण्याचे काही न्यायाधीश आहेत. त्यांच्याकडून न्यायाचा खून होणार नाही, याची खात्री आहे,’ असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्री दिल्लीत आले असतील तर ही त्यांची नेहमीची भेट आहे, कारण ते भाजपाचे मुख्यमंत्री आहेत. त्यांचे हायकमांड येथे आहे. त्यामुळे त्यांना दिल्लीत यावे लागेल. मंत्रिमंडळ तयार करायचे आहे, मंत्र्यांची यादी करायची आहे पण मनोहर जोशी, नारायण राणे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री असताना कधी मंत्रिमंडळाची यादी किंवा सरकार स्थापनेसंदर्भात चर्चा करण्यासाठी दिल्लीत आल्याचे ऐकले नाही. त्या सर्व चर्चा शिवसेनेच्या काळात मुंबईतच होत होत्या, अशी आठवण संजय राऊत यांनी करुन दिली.
भाजपा नेते उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी यांच्या भेटीचे फोटो व्हायरल करत असल्यासंबंधी विचारण्यात आले असता त्यांनी सांगितले की, उद्धव ठाकरे सरकार स्थापन करण्यासाठी आले नव्हते. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून भेटायला आले होते. नरेंद्र मोदी, अमित शाह यांनाही ते भेटले होते. सर्व प्रमुख नेत्यांची भेट त्यांनी घेतली होती. त्यांचे फोटो का व्हायरल करत नाहीत?.
महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाड्यात पुराची गंभीर स्थिती असून, लोकांचे मृत्यू होत आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री येथे राजकारण करण्यासाठी, सरकार वाचवण्यासाठी आले आहेत. निवडणूक आयोगाकडे जातील, शिवसेना खासदारांना फोडण्यासाठी भेटतील,’ अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.