नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रियल टाइम ग्रास सेटलमेंटच्या (आरटीजीएस) नियमांमध्ये १ डिसेंबरपासून बदल केले आहेत. त्याचबरोबर रेल्वे, विमा, गॅस यासंबंधितही काही नियमांमध्ये बदल करण्यात आले  आहेत. याबाबत जाणून घेऊया…

रिझर्व्ह बँकने आरटीजीएसची सेवा २४ तास उपलब्ध करुन दिल्याने ग्राहकांना फायदा होणार असून इतर व्यवहारांप्रमाणे आता ग्राहकांना कधीही आरटीजीएसच्या माध्यमातून व्यवहार करता येणार आहे. उद्यापासून ही सेवा इतर ऑनलाइन मनी ट्रान्फर सेवांप्रमाणे कायमपणे सुरु राहणार आहे.

१ डिसेंबरपासून पीएनबी २.० (पीएनबी, ईओबीसी, ईयूएनआय) वन टाइम पासवर्डवर (ओटीपी) आधारित पैसे काढण्याची (कॅश विड्रॉअल) सुविधा मिळणार आहे. एक डिसेंबरापासून रात्री आठ वाजल्यापासून ते सकाळी आठ वाजेपर्यंत पीएनबी २.० एटीएममध्ये एकाच वेळेस १० हजार रुपयांपेक्षा अधिक पैसे काढायचे असल्यास ग्राहकांना ओटीपी बेस व्यवहार करावे लागणार आहेत. पीएनबी एटीमच्या माध्यमातून पैसे काढण्यासाठी नाईट अवर्समध्ये १० हजार रुपयांपेक्षा अधिक पैसे काढायचे असल्यास ग्राहकांना ओटीपी आवश्यक असणार आहे.  

आता पाच वर्षांनंतर विमा ग्राहक प्रीमियमची रक्कम ५० टक्क्यांपर्यंत कमी करु शकतात. १ डिसेंबर २०२० पासून एखादी विमा पॉलिसी विकत घेतल्यानंतर पाच वर्षानंतर त्या पॉलिसीच्या प्रीमियमची रक्कम ५० टक्क्यांनी कमी करुन ती ग्राहकांना सुरु ठेवता येणार आहे.

भारतीय रेल्वेने १ डिसेंबर पासून रेल्वेच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. कोरोना लॉकडाउननंतर अनेक विशेष गाड्या चालवल्या जात आहेत. आता एक डिसेंबरपासून काही विशेष ट्रेन चालवण्यात येणार आहेत. पुणे- जम्मू – तावी पुणे झेलम स्पेशल आणि मुंबई फिरोजपूर पंजाब मेल या दोन विशेष गाड्या रोज धावतील.

१ डिसेंबर पासून घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत बदल होणार आहे. दर महिन्याच्या पहिल्या तारखेला सरकारकडून घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीची समीक्षा केली जाते. यंदाही डिसेंबरच्या सुरुवातीलाच गॅसच्या दरांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.  देशभरातील घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये बदल होणार आहे.