चंद्रपूर : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल रोजी म्हणजेच आज सकाळी ७ वाजल्यापासून २१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील १०२ जागांवर मतदान होत आहे. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात आज विदर्भातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या मतदार संघात मतदान होत आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणावर जवान तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान चंद्रपूरमध्ये मतदान केंद्रावर राडा झाल्याची माहिती समोर आली आहे.

चंद्रपूर शहरातील हिंदी सिटी हायस्कूल इथल्या मतदान केंद्रावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी राडा केला. मतदान केंद्रावर उमेदवारांच्या यादीवर काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्या नावापुढे कॅन्सल असा शिक्का मारण्यात आल्याने कार्यकर्ते संतप्त झाले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत सुधीर मुनगंटीवार यांचा निषेध केला. नेमका काँग्रेस उमेदवाराच्या नावावरच कॅन्सलचा शिक्का कसा मारला, असा सवाल करत कार्यकर्त्यांनी निवडणूक अधिकाऱ्याला निलंबित करण्याची मागणी केली. अचानक झालेल्या या गोंधळाने केंद्रावर काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.

मतदान केंद्रावर उमेदवारांच्या यादीवर काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांच्या नावापुढे कॅन्सलचा शिका मारल्याने कार्यकर्ते चांगलेच संतापले. मतदान केंद्राच्या मुर्दाबाद मुर्दाबादच्या घोषणा देत होते. आम्ही उमेदवारी मागे घेतली नाही मग कॅन्सलच्या शिक्का का असा संतप्त सवाल कार्यकर्त्यांनी विचारला आहे. हे षडयंत्र असून भाजपाचे अपयश आहे. सत्तेचा माज आहे. मतदान केंद्रावर असलेल्या अधिकारी याला जबाबदार असून त्या अधिकाऱ्याला बडतर्फ केले पहिजे अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. ही लोकशाहीचा हत्या आहे, असे कार्यकर्ते म्हणाले.

नेमकं काय घडलं?
चंद्रपूरमध्ये काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर विरुद्ध भाजपचे सुधीर मुंगंटीवार यांच्यात लढत होत आहे. हिंदी सिटी हायस्कूल मतदान केंद्रावर प्रतिभा धानोरकर यांच्या नावापुढे कॅन्सल असा शिक्का मारण्यात आल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला केला. यामुळे काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले होते.

विदर्भातील पाच जागांसाठी आज मतदान
विदर्भातील पाच जागांसाठी आज मतदान होतंय. सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झालीये.. उमेदवारांनींही आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. नागपुरात भाजप उमेदवार नितीन गडकरी आणि काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे यांनी मतदानाचा हक्क बजावला. चंद्रपूरच्या मविआच्या उमेदवार प्रतिभा धानोकर आणि भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी मतदान केलं. तर दुसरीकडे, रामटेक मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राजू पारवे आणि मविआचे उमेदवार श्यामकुमार बर्वे यांनी देखील मतदान केलं. भंडाऱ्यातील मविआचे उमेदवार प्रशांत पडोळे आणि भाजप उमेदवार सुनील मेंढे यांनीही मतदान केलं. तर गडचिरोली-चिमूरचे भाजप उमेदवार अशोक नेते आणि काँग्रेस उमेदवार नामदेव किरसान यांनींही आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.