नाशिक (प्रतिनिधी) : महाराष्ट्रालाही दोन वर्षापूर्वी स्वातंत्र्य मिळाले आहे. आम्ही महाराष्ट्रावर भगवा फडकला. आमचा मुख्यमंत्री झाला. यांना काय जमतं, असं काही लोक म्हणत होते. पण आम्ही करेक्ट कार्यक्रम करून दाखवला, अशा शब्दांत शिवसेना नेते व खा. संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. नाशिकमध्ये एका कार्यक्रमात ते बोलत होते.  

राऊत पुढे म्हणाले की, राजकारण हे काही साधुसंतांचं नाही. राजकारण हे चांगल्या कामाचं आहे. चांगल्या कार्यकर्त्यांचं आहे. दोन वर्षापूर्वी महाराष्ट्रालाही स्वातंत्र्य मिळाले. आपला मुख्यमंत्री झाला. आपण त्यांना करेक्ट कार्यक्रम करून दाखवला.

७०० शेतकऱ्यांनी बलिदान दिल्यावर पंतप्रधान मोदींना वाटलं माघार घेतली पाहिजे. १९४७ ला स्वातंत्र्यासाठी मोठं आंदोलन झालं. चले जावचा नारा घुमला. अख्खा देश रस्त्यावर उतरला. तेव्हा ब्रिटिशांना वाटलं आपण पळून गेलं पाहिजे. तसंच काल झालं. त्यांना वाटलं आता आपण पळून गेलं पाहिजे. नाही तर जनता रस्त्यावर उतरेल आणि बघणार नाही कोण पंतप्रधान आहे आणि कोण गृहमंत्री आहे. हा शेतकऱ्यांचा विजय झाला. शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळालं, असेही ते म्हणाले.