कोल्हापूर ( प्रतिनिधी ) दोन दिवसांपूर्वी कोल्हापुरातील शनिवार पेठ येथे राजेश क्षीरसागर हे एका व्यक्तीला मारहाण करतानाचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला. यानिमित्ताने कोल्हापूर शहरात शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट परस्परांविरोधी समोर ठाकले असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान आज दोन्ही गटाच्या पदाधिकाऱ्यांनी याप्रकरणी एकमेकांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापुरातील शनिवार पेठ येथे एका व्यक्तीच्या घरामध्ये मारहाण झाल्याचे व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला. यामध्ये माजी आमदार क्षीरसागर आणि त्यांच्या मुलगा सहभागी असल्याचा आरोप संबधित तक्रारदारासह ठाकरे गटच्यावतीने करण्यात आला आहे.

त्यामुळे या प्रकरणाने आता राजकीय वळण घेतले असून, या प्रकरणाची चौकशी व्हावी, यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे संजय पवार, रविकिरण इंगवले, विजय देवणे, सुनिल मोदी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस प्रमुखांची भेट घेत निवेदन दिले.

त्यानंतर शिवसेना शिंदे गट पदाधिकाऱ्यांनी देखील जिल्हा पोलीस प्रमुखांची भेट घेत आपली तक्रार नोंदवली आहे. शिंदे गटाचे सुजित चव्हाण, शिवाजी जाधव, किशोर घाटगे, अकुंश निपाणीकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी याप्रकरणाची सखोल चौकशी करुन सत्य बाहेर आणावे, अशी मागणी करत जिल्हा पोलिस प्रमुखांना निवेदन दिले. यामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता. त्यामुळे या वादाची चर्चा आता जिल्हाभरात चांगलीच चर्चेत आली आहे.