कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरणे, सामाजिक अंतर ठेवणे, वारंवार हात धुणे अशा प्रतिबधक उपाययोजनांची प्रभावी जागृती उपयुक्त आहे. असे मत महापालिका उपायुक्त निखिल मोरे यांनी आज (मंगळवार) येथे व्यक्त केले.

केंद्र शासनाच्या क्षेत्रीय लोकसंपर्क कार्यालयाच्यावतीने कोरोनापासून स्वत:ला वाचवा असा जनजागृतीपर फलक कोल्हापूर महापालिकेमध्ये लावण्यात आले असून त्याचे उद्घाटन तसेच चित्ररथाचा शुभारंभही उप-आयुक्त निखिल मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी क्षेत्रीय प्रचार अधिकारी प्रमोद खंडागळे, महापालिकेचे प्रचार व प्रसिध्दी समन्वयक एस. आर. माने आदी उपस्थित होते.

निखिल मोरे म्हणाले की, कोरोनाचा संसर्ग कमी होत असला तरी कोरोनाचा धोका कायम असल्याने नागरिकांनी कोरोनापासून स्वत:ला, कुटुंबाला आणि समाजाला वाचविण्यासाठी कोरोना प्रतिबंधक उपाययोजना कायम अंमलात आणणे गरजेचे आहे. यासाठी केंद्र शासनाच्या क्षेत्रीय लोकसंपर्क कार्यालयाच्यावतीने कोरोनापासून स्वत:ला वाचवा, असे फलक तसेच चित्ररथ आणि शाहिरी कार्यक्रम निश्चितच उपयुक्त असल्याचे उप आयुक्तांनी सांगितले.

यावेळी क्षेत्रीय लोकसंपर्क कार्यालयाच्याचे तसेच महापालिकेचे अधिकारी-कर्मचारी, महापालिकेच्या जनसंपर्क कार्यालयाचे राजेंद्र जाधव, अक्षय अडमाने आदी उपस्थित होते.