कोल्हापूर (प्रतिनिधी) : इचलकरंजी येथील डीकेटीई या शिक्षण संस्थेेतील मनमानी कारभाराविरोधात स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेने आक्रमक पवित्र घेतला असून, ‘स्वाभिमानी’तर्फे शिवाजी विद्यापीठात आंदोलन करण्यात आले.

डीकेटीई शिक्षण संस्था ऑटोनोमस असल्याने या संस्थेअंतर्गत होणाऱ्या सर्व परीक्षा महाविद्यालय अंतर्गत घेतल्या जातात. जे विद्यार्थी नापास होतात त्यांना वर्षातून तीन वेळा परीक्षा देण्याची परवानगी असते; परंतु डीकेटीई ही एकमेव संस्था तीन वेळा परीक्षा घेत नसल्याने विद्यार्थी नापास होतात आणि त्यांचे इयर डाऊन होत आहेत. या प्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे.

डीकेटीई इचलकरंजी येथील महाविद्यालयात दीडशेहून अधिक विद्यार्थी नापास झाले आहेत. याबाबत स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून आज शिवाजी विद्यापीठ येथे विद्यार्थ्यांच्या पालकांसह सौरभ शेट्टी यांनी आंदोलन केले. यावेळी विद्यापीठ प्रशासनाने याबाबत विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकत योग्य ते मार्गदर्शन केले.

यावर विद्यापीठ प्रशासनाने स्वायत्त शिक्षण संस्थांचा संबंध थेट यूजीसी सोबत असल्याने यासंदर्भात सगळी माहिती घेऊन विद्यापीठाने डीकेटीई महाविद्यालयास पत्र पाठवण्याची आश्वासन दिले; पण सर्वस्व निर्णय त्या स्वायत्त महाविद्यालयाचा असल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले. यावर आजपासून स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेकडून डीकेटीई या महाविद्यालयाच्या बाहेर निकाल लागेपर्यंत बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय सौरभ शेट्टी यांनी घेतला आहे. यावेळी विनय पाटील, रोहित पुदाले, अण्णा सुतार, यांच्यासह विद्यार्थी व पालक उपस्थित होते.