कोल्हापूर ( प्रतिनिधी ) कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत सन 2023-24 मध्ये जिल्हा परिषद स्वनिधी अंतर्गत 50 टक्के अनुदानावर कडबाकुट्टी मशिन पुरविणे व 75 टक्के अनुदानावर शेळी गट वाटप या वैयक्तिक लाभाच्या योजना राबविण्यात येत आहेत. याचा लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार सन 2023-24 मध्ये जिल्हा परिषद स्वनिधी अंतर्गत 50 टक्के अनुदानावर कडबाकुट्टी मशिन पुरविणे व 75 टक्के अनुदानावर शेळी गट वाटप या वैयक्तिक लाभाच्या योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचे अर्ज पंचायत समिती स्तरावर दिनांक 16 ते 27 ऑक्टोबर या कालावधीत स्विकारण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रमोद बाबर यांनी कळविले आहे.


त्यामुळे जिल्ह्यातील 100 पशुपालकांना 10 हजार रुपयांच्या मर्यादेत 50 टक्के अनुदानावर 2 एच पी कडबाकुट्टी मशिन वाटप करण्यात येणार आहे. या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी पशुपालकाकडे जनावरे असणे आवश्यक असून पात्र शेतकऱ्यांनी अर्ज करावा असे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी जिल्ह्यातील 72 विधवा, परितक्त्या, दारिद्रय रेषेखालील महिलांना 13 हजार 805 रुपयांच्या मर्यादेत 75 टक्के अनुदानावर 2 शेळींचा गट वाटप करण्यात येणार आहे. पात्र व गरजू लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही बाबर यांनी केले आहे.