कोल्हापूर (प्रतिनिधी) : मुंबई येथे सुरू असलेल्या ३७ व्या महाराष्ट्र राज्य शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत कोल्हापूरच्या अनुष्का पाटीलने पदकांवर ३ मोहर उमटवली. स्पर्धेत कोल्हापूरसह पुणे, नागपूर, औरंगाबाद, सातारा, जालनाव अन्य जिल्ह्यांतून ३५० हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. राज्य शूटिंग स्पर्धेत अनुष्काला तीन पदके मिळाली.

दहा मीटर एअर पिस्तूल प्रकारात ६०० पैकी ५६७ गुण मिळवत पात्रता फेरीत ज्युनिअर गटात अव्वलस्थान मिळविले. या स्पर्धकांमधून टॉप ८ नेमबाजांची निवड अंतिम फेरीत झाली. यामध्ये अनुष्काने ज्युनिअर व सीनिअर या दोन्ही गटांमध्ये कास्यपदक पटकावले. ५० मीटर फ्री पिस्टल गटात अनुष्काने ५०९ गुण मिळवत ज्युनिअर गटात रौप्यपदक पटकावले. अनुष्का कोल्हापूर येथील गोखले कॉलेजमध्ये बी.एस्सी कॉम्प्युटर सायन्सचे शिक्षण घेत आहे. ती पुणे क्रीडा प्रबोधिनीची अनिवासी खेळाडू आहे. तिला प्रबोधिनीचे प्राचार्य सुहास पाटील, नवनाथ फडतरे, संदीप तरटे, ऑलम्पिक खेळाडू गगन नारंग, प्रशिक्षक सी. के. चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले.