पुणे : महाविकास आघाडीच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे, शिरूरचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे आणि पुण्यातील उमेदवार रवींद्र धंगेकर आज गुरुवारी (१८ एप्रिल) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. महाविकास आघाडीच्या वतीने आज शक्तिप्रदर्शन करण्यात येणार असून शरद पवार यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत.

या सभेच्या निमित्ताने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अजित फाटकेही सभेला मार्गदर्शन करणार आहेत. महाविकास आघाडी लोकसभा निवडणुकीचे आज (गुरूवारी) रणशिंग फुंकणार आहे. विशेष म्हणजे बारामतीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या उमेदवार सुनेत्रा पवार याही आजच उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.