कोल्हापूर (प्रतिनिधी) : महानायक अमिताभ बच्चन आणि दातृत्व हे एक समीकरणच बनले आहे. याची प्रचिती अनेकांना आली आहे. सामाजिक संस्था असो संघटना असो की, असहाय्य व्यक्तींसाठी बच्चन नेहमीच धावून जातात. आता त्यांनी कोल्हापुरातील अवनी संस्थेसाठी ११ लाखांची मदत देण्याचे जाहीर केले आहे.

सोनी वाहिनीवरील ‘कौन बनेगा करोडपती’ या मालिकेसाठी अवनी संस्थेच्या सर्वेसर्वा अनुराधा भोसले यांची निवड झाली आहे. या भागाचे शुटींग ३० ऑक्टोबरला मुंबईतील स्टुडिओत झाले. या भागात भोसले यांच्या जीवनातील संघर्ष आणि त्यातून त्यांनी अवनी संस्थेच्या माध्यमातून बालकामगारविरोधी सुरू केलेली चळवळ, बाल हक्क, बाल शिक्षण आदीबाबत त्यांना केलेल्या कार्याचा आढावा घेण्यात आला. भोसले यांचे काम पाहून प्रभावित झालेल्या अमिताभ बच्चन यांनी या संस्थेसाठी ११ लाखांची मदत दिली. विशेष म्हणजे त्यांनी कोल्हापुरात आल्यानंतर संस्थेला भेट देणार असल्याचे सांगितले. दरम्यान, ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमातून अनुराधा भोसले यांचे जीवनचरीत्र शुक्रवारी (दि.२०) प्रसारित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात भोसले यांच्यासोबत दिग्दर्शक नागनाथ मुंजळे सहभागी झाले आहेत.