कोल्हापूर (प्रतिनिधी) : शहर आणि जिल्ह्यातील सर्व दुकाने आता रात्री दहापर्यंत सुरू करण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. यामुळे हॉटेल, बारपाठोपाठ सर्व दुकानांची आस्थापने पूर्वीप्रमाणे सुरू राहणार आहेत.
कोरोनामुळे दुकाने किती वाजेपर्यंत सुरू ठेवावीत, यासंबंधी नियमावली तयार करण्यात आली आहे. दरम्यान, सरकारने अनलॉकची प्रक्रिया सुरू केल्यानंतर बार, हॉटेलना रात्री दहापर्यंत सुरू ठेवण्यास मुभा दिली. याच प्रमाणे इतर दुकानेही सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी जोर धरली होती. याच मागणीचे निवेदन राजारामपुरी व्यापारी असोसिएशन जिल्हाधिकारी दौलत देसाई आणि महानगरपालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्याकडे केली होती. याची दखल घेवून प्रशासनाने दुकाने, व्यापार, व्यवसाय रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी दिली. यामुळे दुकानदारांकडून समाधान व्यक्त होत आहे.