बेळगाव (प्रतिनिधी) : सीमा भागातील बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार करणे, ही त्यांना खरी आदरांजली ठरणार आहे. त्यासाठी आपण प्रयनशील आहोत, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्यामुळे कन्नडिगांनी थयथयाट सुरु केला आहे. त्यांनी आज (बुधवारी) राणी चन्नम्मा चौकात पवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.

मंगळवारी (ता. १७) बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आदरांजली वाहताना उपमुख्यमंत्री पवार यांनी बेळगाव, कारवार, निपाणीसह मराठी भाग महाराष्ट्रात समाविष्ट करणे, हे बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. ते साकार करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत, अशी ग्वाही देत आदरांजली वाहिली होती. या विरोधात बेळगावातील कन्नड संघटना आक्रमक झाल्या आहेत. ते पवार यांच्या विरोधात संताप व्यक्त करत आहेत. यातूनच ते पवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून महाराष्ट्र सरकार विरोधात घोषणाबाजीही केली. दरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येडीयुरप्पा यांनी पवार यांच्या वक्तव्याचे खंडन केले आहे.