मुंबई (प्रतिनिधी) : राज्यपाल कोश्यारींच्या वादग्रस्त विधानावर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर उद्धव ठाकरेंना बोलावेच लागते, असा खोचक टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंना लगावला आहे.

छत्रपती उदयनराजे यांनी पत्र लिहिल्यानंतर शरद पवारांच्या लक्षात आले की आपल्यासमोर घटना घडली आणि आपण त्यावर कुठलीच प्रतिक्रिया दिली नाही. उदयनराजेंनी लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया आज दिली. शरद पवारांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर उद्धव ठाकरेंना प्रतिक्रिया द्यावीच लागते. त्यानुसार त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे आता त्याला राजकीय रंग कसा देता येईल? याचा प्रयत्न सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराज उभ्या भारताचे दैवत आहेत. त्यामुळे त्याबद्दल कुठला वादही होऊ शकत नाही. त्यावर कुणी राजकाऱण करणे हेही योग्य होणार नाही. आज हे उदयनराजेंच्या पत्रामुळे खडबडून जागे झाले आहेत’, असेही फडणवीस म्हणाले.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या विधानावरून सध्या राज्यातले राजकारण तापले आहे. संभाजीराजे छत्रपती, उदयनराजे भोसले, काँग्रेस, ठाकरे गट, शिंदे गट अशा सगळ्यांनी या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका मांडली. यानंतर आज ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (गुरुवारी) पत्रकार परिषद घेऊन यावरून राज्यपालांना आणि भाजपालाही लक्ष्य केले. त्यासंदर्भात उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना खोचक शब्दांत टोला लगावला आहे. यावेळी फडणवीसांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनाही प्रत्युत्तर दिले.

‘सीमाप्रश्नावर सर्वोच्च न्यायालय योग्य निर्णय घेईल याची आम्हाला अपेक्षा आहे. सर्वोच्च न्यायालयापेक्षा कुणीही मोठ नाही. कर्नाटकचे मुख्यमंत्रीही मोठे नाहीत किंवा इतर कुणीही मोठ नाही. त्यामुळे त्यांनी काहीही दावा ठोकला, तरी महाराष्ट्रातल एकही गाव जाणार नाही. आमचा सीमाभाग आम्हाला परत मिळेल ही मला अपेक्षा आहे’, असे फडणवीस म्हणाले.