कोल्हापूर (प्रतिनिधी) : प्लास्टिकचे उत्पादन जेथून आयात होते तेथे कारवाई महापालिका प्रशासनाने तातडीने करावी आणि प्लास्टिक बंदीबाबत व्यापारी आणि दुकानदारांवर होणारी कारवाई थांबवावी, अन्यथा उज्वल कोल्हापूर संघटनेच्या वतीने प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असल्याने महापालिकेच्या वतीने शहरातील व्यापारी तसेच दुकानदारांवर कारवाई करण्यात येत आहे. केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार व्यापारी तसेच दुकानदारांवर होणारी ही कारवाई अत्यंत चुकीच्या पद्धतीने महापालिका प्रशासन करत आहे. मुळात व्यापारी आणि दुकानदारांवर कारवाई करून प्लास्टिक वापर थांबणार नाही.

प्लास्टिक बंदीच्या नावाखाली नागरिक, व्यापारी, दुकानदारांना लुटण्याचे काम करू नये. महापालिका प्रशासनाने शहरातील विविध प्रश्नांची सोडवण्यासाठी लक्ष केंद्रित करून सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचे काम करावे, अशी मागणी उज्वल कोल्हापूर संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन महापालिकेचे उपआयुक्त तथा प्रशासक रविकांत आडसुळे यांना देण्यात आले. यावेळी गणेश लाड, अजित पाटील, नितेश कुलकर्णी, किरण गायकवाड, अभिजित कदम, राजाराम नरके, निवास भोसले, लखन काझी आदी उपस्थित होते.