कोल्हापूर (प्रतिनिधी) : उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोर एका तरुणाने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला वेळीच रोखल्याने पुढील अनर्थ टळला. कोल्हापूरमध्ये चंद्रकांत पाटील हे जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीसाठी आले होते. त्यांच्यासमोरच ही धक्कादायक घटना घडल्याने पोलीस प्रशासनाची तारांबळ उडाली.

परशुराम नामदेव कांबळे असे या तरुणाचे नाव आहे. जयसिंगपूर नगरपालिकेत अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळण्याची मागणी करूनही न्याय मिळत नसल्याने परशुराम कांबळे याने जिल्हाधिकारी दालनासमोरच अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला; पण तेथे हजर असलेल्या पोलिसांनी लगेच झडप घालून त्याला रोखले.

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोरच घटना घडूनही पाटील यांनी आत्मदहन करणाऱ्या परशुराम कांबळे या तरुणाची साधी विचारपूसही केली नाही. पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतल्यानंतर पाटील हे आपला ताफा घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयातून निघून गेले. आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या परशुराम कांबळे याला पोलिसांनी घेतले ताब्यात आहे .

‘आम्ही सर्व पत्रव्यवहार केले, अधिकाऱ्यांनी आमच्याकडून पैसे घेतले आहे; पण अजूनही न्याय मिळाला नाही. सगळी कागदपत्रे देऊनही पालिकेकडून निर्णय घेतला जात नाही, असे संबंधित युवकाने सांगितले. तसेच नगरविकासमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनाही भेटलो होतो. मंत्रालयातही अनेक चकरा मारल्या. आमच्याकडे पैसे नाही, त्यामुळे मुंबईला जाऊ सुद्धा शकत नाही, अशी व्यथाच या तरुणाने मांडली.