कुडाळ ( प्रतिनिधी ) अभ्यासाचे धडे देणार्‍या शिक्षकाने विद्यार्थ्याला मारहाण करत असल्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. शिक्षक विद्यार्थ्याला मारहाण करत असताना एका विद्यार्थ्याने हा व्हिडीओ शुट केल्याने हा प्रकार उघड झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका नामांकित शाळेतील हा व्हिडी असून आपण अडचणीत येवू नये म्हणून त्या शिक्षकाने विद्यार्थ्याच्या घरी जावून माफी मागितली.

मात्र हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे खळबळ उडाली असून, हा प्रकार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहे. यातच शिक्षणमंत्री दीपक केसरकर देखील याच जिल्ह्यातील असल्याने चर्चेला आणखी वेग आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, जिल्ह्यातील एका नामांकित शाळेत हा प्रकार घडला आहे. संबंधित विद्यार्थ्याच्या डोक्यात मारल्यानंतर शिक्षकांनी विद्यार्थ्याचा गळा धरत पुन्हा मारहाण केली. ही घटना चार दिवसापूर्वीची असून आता ती सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

दरम्यान या प्रकाराबाबत कुडाळातील नागरिकांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे. यात संबंधित शिक्षक अशाच प्रकारे मारहाण करत असल्याचा सुर ही आता आळवला जाऊ लागला आहे. तसेच झालेल्या प्रकारानंतर आपण अडचणीत येवू नये म्हणून त्या शिक्षकाने त्या विद्यार्थ्याच्या घरी जावून माफी मागितल्याची माहिती पुढे येत आहे. दरम्यान हे प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न झाला असला तरी व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे या प्रकारामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

छडी लागे छम छम..!

छडी लागे छम छम विद्या येऊ घम घम हि संकल्पनेला केराची टोपली जात आहे का ? यावर देखील विचार होणे आवश्यक आहे. कारण शालेय वयात योग्य संस्कार न झाल्यास विद्यार्थ्याच्या भविष्याबद्दल वेगळे सांगणे आवश्यक नाही. त्यामुळे मर्यादीत धाक ही संकल्पना विद्यार्थ्यांच्या आणि समाजाच्या हिताचा विचार होणे आवश्यक आहे.