मुंबई (प्रतिनिधी) : गोवरच्या वाढत्या संसर्गामुळे राज्यात वाढलेल्या बालमृत्यूंची संख्या तसेच दहा महिन्यांत झालेल्या १०,२८५ बालमृत्यूंनी आरोग्य व्यवस्थेचे अपयश समोर ठेवले आहे. दहा महिन्यांत राज्यात १०,२८५ बालकांचा मृत्यू झाला असून, यात आदिवासी भागामध्ये झालेल्या बालमृत्यूंची संख्या १९३१ आहे. शून्य ते एक या वयोगटामधील ८०६१ तर १ ते ५ वर्ष वयोगटातील २,२२४ बालमृत्यू झाले आहेत.

कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी मागील दोन वर्षांपासून आरोग्य यंत्रणा काम करीत असताना महिला व बालकांच्या आरोग्याच्या प्रश्नांकडे लसीकरणापासून इतर अनेक पातळ्यावंर दुर्लक्ष झाल्याचे विदारक वास्तव कुपोषण व बालमृत्यूंच्या आकड्यांतून स्पष्ट झाले आहे. थांबलेले-चुकलेले लसीकरण, बंद असलेल्या अंगणवाड्या, आहार-पोषणाच्या संदर्भात न झालेले सर्वेक्षण, पुरेशा पोषण आहाराचा अभाव, रोजगार गमावल्यामुळे आलेली भ्रांत, कुपोषित माता, अपुऱ्या दिवसांची प्रसूती यामुळे बालमृत्यूंमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.