मुंबई (प्रतिनिधी) : रोहित शेट्टीच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘सर्कस’ या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. विल्यम शेक्सपिअर यांच्या ‘अ कॉमेडी ऑफ इरर्स’ या नाटकावर आधारित हा चित्रपट आहे. यामध्ये रणवीर सिंग दुहेरी भूमिकेत पाहायला मिळतोय. करिअरमध्ये पहिल्यादाच रणवीर अशी दुहेरी भूमिका साकारतोय. १९६० च्या दशकातील कथा प्रेक्षकांना या चित्रपटातून पाहायला मिळणार आहेच; मात्र सर्कसच्या टीझरने प्रेक्षकांची निराशा केली आहे.

सहसा चित्रपटाच्या टीझरमध्ये महत्त्वपूर्ण दृश्ये, डायलॉग्स पहायला मिळतात; मात्र ‘सर्कस’च्या टीझरमधून ट्रेलरची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळेच प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. जवळपास एक मिनिटाच्या या ‘टीझर’मध्ये चित्रपटातील कोणतंच दृश्य पहायला मिळत नाही. ‘सर्कस’च्या बाहेर पायऱ्यांवर चित्रपटातील कलाकार बसलेले असून ते प्रेक्षकांशी संवाद साधताना दिसत आहेत. संजय मिश्रा आणि जॉनी लिव्हर हे प्रेक्षकांना ६० च्या दशकाची, जुन्या सुंदर दिवसांची आठवण करून देतात. त्यानंतर रणवीरच्या दोन्ही भूमिका पहायला मिळतात.

सर्कस ही त्या वेळची कथा आहे जेव्हा आई-वडिलांचे प्रेम हे सोशल मीडियावरील लाईक्सपेक्षा जास्त महत्त्वाचे होते, असे तो म्हणतो. सर्कसचा ट्रेलर येत्या २ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार, याचीही घोषणा या टीझरमध्ये करण्यात आली. या चित्रपटात जॅकलिन फर्नांडिस, पूजा हेगडे, वरुण शर्मा, विजय पाटकर, सुलभा आर्या, टिकू तलसानिया, वृजेश हिरजी, अश्विनी काळसेकर आणि मुरली शर्मा यांच्याही भूमिका आहेत. या वर्षाच्या अखेरीस ख्रिसमसच्या मुहूर्तावर म्हणजेच २४ डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.