जेजुरी (प्रतिनिधी) : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सकाळी जेजुरीतील खंडेरायाचे दर्शन घेतले. सीतारामन यांनी जेजुरी संस्थानच्या पदाधिकाऱ्यांची बैठकही घेतली. त्यावेळी देवस्थानच्या वतीने सीतारामन यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौऱ्यावर आहेत. बारामती मतदारसंघातील सर्व तालुक्यांमध्ये सीतारामन भेट देऊन विविध घटकांशी संवाद साधत आहे. त्यांच्यासोबत इंदापूरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री राम शिंदे, बाळा भेगडे, आमदार राहुल कुल, आ. माधुरी मिसाळ, आ. उमा खापरे, कांचन कुल, अंकिता पाटील यांच्यासह जेजुरी गडाचे विश्वस्त उपस्थित हते.

या निवेदनात जेजुरी गडाला पर्यटनाचा दर्जा मिळावा, वर्ल्ड हेरीटेजचा दर्जा मिळावा, जेजुरी रेल्वे स्टेशनवर एक्सप्रेस गाड्या थांबवाव्यात, अशी मागणी जेजुरी संस्थानच्या वतीने अर्थमंत्र्यांना करण्यात आल्याचे पंकज निकुडे यांनी सांगितले. सीतारामन यांनी जेजुरी गडावरील मंदिराची पाहणी करत मंदिराचा इतिहास विश्वस्तांकडून जाणून घेतला. त्यानंतर त्यांनी खंडेरायचे दर्शन घेत भंडाऱ्याची उधळण केली. गडावरील ऐतिहासिक खंडा तलवारची पाहणी केली. यावेळी मोठ्या आणि जड तलवारीची प्रात्याक्षिक त्यांना करून दाखविण्यात आले. मंदिर ट्रस्टच्या वतीने त्यांचा खंडोबाची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला.