कुंभोज (प्रतिनिधी) :  सोयाबीन बियाणांचे वाढलेले दुप्पट दर, खते मशागतीसाठी येणारा खर्च, काढणी व मळणीसाठी मजुरांना मागणी प्रमाणे द्यावी लागणारी मजुरी, पावसाचे कमी-अधिक प्रमाण, अचानक नऊ हजारावरून पाच हजार रुपयांपर्यंत घसरलेले सोयाबीनचे दर यामुळे शेतकरी वर्ग मेटाकुटीला आला आहे. परिणामी सोयाबीन खरेदी करणारे व्यापारी मालामाल व शेतकरी मात्र कंगाल अशी चित्र सध्या ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहे.

सोयाबीनचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना अगोदर बियाणे कंपनीने लुटले. उत्पादन चांगले व्हावे यासाठी खत घालणे, कीटकनाशकांची फवारणी करणे, सोयाबीनचे पीक काढणे यावरच शेतकऱ्यांचा बराचसा पैसा खर्च झाला. त्यामुळे चार महिने राबून हातात फक्त सोयाबीनची फोलफटेच राहिली आहेत. सोयाबीन पिकाच्या उत्पादनातून अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने शेतकरी वर्ग निराश झाला आहे. त्यामुळे वर्षभर करायचे काय? असा सवाल सामान्य शेतकऱ्यांतून विचारला जात आहे.

ऐन दसरा सणाच्या तोंडावर सोयाबीन पिकाच्या माध्यमातून चार पैसेही न मिळाल्याने शेतकऱ्यांची जणू आर्थिक फसगत झाल्याचे मत व्यक्त आहे. सोयाबीनच्या पिकावर आधारित असलेली सर्व अर्थव्यवस्था कोलमडल्याचे चित्र दिसत आहे. सोयाबीन काढण्यासाठी घातलेला खर्चसुद्धा न निघाल्याने फक्त मजुरांची मजुरी देण्यावरच सारा पैसा खर्च झाल्याने शेतकरी वर्ग हतबल झाला आहे.