श्रीधर वि. कुलकर्णी

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्म-दिवसाच्या निमित्ताने शिक्षकांप्रती सन्मान प्रकट करण्यासाठी शिक्षक दिन साजरा केला जातो. गुरु-शिष्य परंपरा भारतीय संस्कृतीमधील एक महत्त्वपूर्ण आणि पवित्र भाग आहे. जीवनात आई-वडिलांची जागा कुणीही भरू शकत नाही. जीवनातील सर्वात पहिले गुरु आई-वडील असतात. भारतात प्राचीन काळापासून गुरु-शिष्य परंपरा असून, शिक्षक हे जगण्याचा योग्य मार्ग दाखवतात. योग्य दिशेकडे वाटचाल करण्यासाठी प्रेरित करतात. 

शिक्षण हे परिवर्तनाचे प्रभावी माध्यम मानले गेले आहे. शिक्षणामुळे समाजात शांतीयुक्त क्रांती निर्माण होते. आजच्या प्रचलित शिक्षण पद्धतीत बदल घडला पाहिजे, याविषयी सर्वांचेच एकमत आहे.हे परिवर्तन घडत असताना भारताचा धार्मिक व सांस्कृतिक वारसा, इतिहास, ज्ञान-परंपरा यांच्या बरोबरीनेच आधुनिक जगातील वैज्ञानिक प्रगती आणि भविष्यकाळाची आव्हाने यांचाही समग्रतेने विचार होण्याची आवश्यकता आहे.

भावी पिढीचा शिल्पकार म्हणून ज्या शिक्षकांचा समाजात निर्देश केला जातो, त्या शिक्षकांची उभारणी एका मजबूत अशा व्यवस्थापनाच्या पायावर अवलंबून असते. शिक्षकाचे व्यक्तिमत्त्व अष्टपैलू असायला हवे. शिक्षक आपल्या व्यवसायावर परिपूर्ण असेल तरच जीवनातील आव्हाने पेलणारा तो विद्यार्थी निर्माण करू शकेल यात शंका नाही. याचा विचार करता शिक्षकाला शिक्षण महाविद्यालयातच शैक्षणिक व्यवस्थापनाच्या सर्व अंगांची परिपूर्ण माहिती हवी. तसेच शिक्षणाच्या पुनर्रचित अभ्यासक्रमात शैक्षणिक व्यवस्थापन हे उद्दिष्ट उपलब्ध व्हायला हवे.

शिक्षण आयोगामध्ये शिक्षकांच्या कार्याबाबत चार प्रमुख बाबी सांगितलेल्या आहेत. त्यात शिक्षकाने आपल्या विषयाचे सखोल ज्ञान मिळवत राहावे, त्याचे उत्तम व्यवस्थापन करावे, आपल्या विषयात विविध समस्यांवर संशोधन करावे आणि त्या संशोधनातून, तसेच विविध उपक्रमांतून शिक्षणात बदल घडवून आणावेत. शैक्षणिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा व्हावयास हवी. त्यासाठी शाळांचे नियोजन व प्रशासन उत्कृष्ट असावयास हवे. शैक्षणिक व्यवस्थापन म्हणजे शैक्षणिक धोरणांचा विकास करणे, अध्ययन-अध्यापनाच्या कार्याला प्रेरणा देणे व शिक्षण प्रक्रियेतील मानवी व भौतिक घटकांची सुव्यवस्था करणे होय. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात सार्‍याच क्षेत्रांमध्ये व्यवस्थापनाची गरज निर्माण झाली आहे

इंग्रजी बरोबरीनेच स्थानिक भाषांचे परिपूर्ण शिक्षण विद्यार्थ्यांना मिळाले पाहिजे. समाजजीवन व व्यक्तीजीवन यांद्वारे वाढणाऱ्या नकारात्मक प्रवृत्तींना फोफावू न देता त्याऐवजी सामाजिक दायित्व व सामाजिक चेतना शिक्षणामुळे वाढीस लागली पाहिजे. प्राथमिक शिक्षणास प्राधान्य देणे फार गरजेचे आहे. शिक्षणाच्या प्राथमिक स्तरावर एकीकडे स्वयंघोषित व काहीवेळा शासन पुरस्कृत इंग्रजी शाळा व दुसरीकडे रोडावलेल्या स्थानिक पुरस्कृत इंग्रजी शाळा व दुसरीकडे रोडावलेल्या स्थानिक माध्यमांतील सरकारी शाळा या दुपदरी शिक्षण पद्धतीमुळे समाजात उत्पन्न होणारा वर्गभेद थांबविण्यासाठी समान-तत्त्वांवर आधारित सुदृढ शिक्षण पद्धतीची आवश्यकता आहे. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याची जशी ही अवस्था आहे, त्याप्रमाणे मूल्यशिक्षणाद्वारे सामाजिक कर्तव्यांची त्याला जाणीव करून देणारे शिक्षण मिळाले पाहिजे. उच्च माध्यमिक शिक्षण हे व्यवसायाभिमुख असावे. योग, उद्योग, प्रयोग व सहयोग अशा चार सूत्रांमधून शिक्षणाची चढती कमान योजली पाहिजे. कोणत्याही स्तरावरून विद्यार्थी समाजात गेला तरीही तो समाजहिताची भावना घेऊनच जाईल, अशी व्यवस्था या पद्धतीत अभिप्रेत आहे.