कोल्हापूर (प्रतिनिधी) : शाहूवाडी-पन्हाळ्यातील विविध रस्त्यांचे रुंदीकरण, मजबुतीकरण, डांबरीकरण करणे, दुरुस्ती, पूल बांधणे आणि अन्य कामांसाठी ५० कोटींचा निधी राज्य शासनाने मंजूर केला असल्याची माहिती आ. विनय कोरे यांनी दिली.

राज्य शासनाने जुलै बजेटमध्ये शाहूवाडी तालुक्याकरिता राज्यमार्गासाठी ४ कोटी ५५ लाख व प्रमुख जिल्हा मार्गाकरिता २५ कोटी ०५ लाख असा रस्ते रुंदीकरण, सुधारणा व पूल बांधणे या कामांकरिता, तर पन्हाळा तालुक्यातील राज्यमार्गाकरिता १० कोटी ७५ लाख व प्रमुख जिल्हा मार्गकरिता १४ कोटी असा रस्ते रुंदीकरण, सुधारणा व पूल बांधणे या कामाकरिता एकूण शाहूवाडी तालुक्यासाठी २९ कोटी ६० लाख व पन्हाळा तालुक्यासाठी २० कोटी २० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

शाहूवाडी-पन्हाळा या दोन्ही तालुक्यातील विविध रस्त्यांचे डांबरी नूतनीकरण अथवा मजबुतीकरणासह नूतनीकरणासाठी हा निधी मिळावा, यासाठी आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांनी पाठपुरावा केला होता.रस्ते देखभाल दुरुस्ती योजनेतर तरतुदीतून मजबुतीकरण आणि डांबरीकरणासाठी विशेष दुरुस्ती कार्यक्रमांतर्गत या रस्त्यांना त्यात समाविष्ट करुन निधी उपलब्ध करुन देण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाशी पाठपुरावा केला होता. या विभागाने ही मागणी मान्य करुन तब्बल ५० कोटी एवढा निधीही मंजूर केला आहे, अशी माहिती आमदार डॉ. विनय कोरे यांनी दिली.

पन्हाळा शाहूवाडी विधानसभा मतदारसंघातील विविध प्रश्नांसाठी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व ग्रामविकासमंत्री गिरीष महाजन यांची आमदार विनय कोरे यांनी भेट घेतली.

शाहूवाडी-पन्हाळा विधानसभा मतदारसंघातील अनेक गावांतील रस्ते अत्यंत खराब झाले आहेत. ही बाब विचारात घेऊन शासनाने ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा पुरवणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी लोकप्रतिनिधी या नात्याने ते रस्ते २५-१५ योजनेतून करण्यासाठी निधीची मागणी ग्रामविकासमंत्री गिरीष महाजन यांच्याकडे केली. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना २ लक्ष्यवेधी असलेले पत्र दिले. यावेळी आ. विनय कोरे यांच्यासह पिंपरी-चिंचवडचे महेश लांडगे, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम आदी उपस्थित होते.