दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्य निवडणूक आयोगाने नुकत्याच राज्यातील नगरपालिकेच्या निवडणुका जाहीर केल्या; पण या निवडणुका पुढे ढकलण्याबाबत चर्चा करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सागितले आहे. सध्या पावसाळा आहे. अडचणी निर्माण होऊ शकतात. पावसाळ्यात मनुष्यबळही जास्त लागेल. त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात, यावर आयोगाशी चर्चा करणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

दरम्यान, ऐन पावसाळ्यात होणाऱ्या नगरपरिषदांच्या निवडणुकीनिमित्त प्रशासन मतदारांपर्यंत कशा पद्धतीने पोहोचणार आणि सर्वच राजकीय पक्षांना प्रचार यंत्रणा कशी राबवायची, हा प्रश्न भेडसावणार असल्याचे वृत्त शुक्रवारीच ‘लाईव्ह मराठी’ने प्रसारित केले होते. पावसाळ्यात होणाऱ्या न.पा. निवडणुकीमध्ये येणाऱ्या अडचणींकडेही लक्ष ‘लाईव्ह मराठी’ने वेधले होते.

ओबीसी आरक्षणासंदर्भातील प्रकरण सध्या कोर्टात आहे. यावर निर्णय येणे बाकी आहे, पण आरक्षणावर निर्णय झाल्यावर निवडणुका घ्याव्यात, अशी आमची पहिल्यापासून इच्छा आहे. सगळीकडे पाऊस आहे. बऱ्याच ठिकाणी पूर येत आहे आणि अशा परिस्थितीत निवडणुकीसाठी यंत्रणा तयार करणे अवघड आहे. त्यामुळे आम्ही निवडणूक आयोगाशी बोलणार आहोत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत विचारले असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आम्ही दोघे उद्या आषाढी एकादशी झाली की मुंबईत बसून चर्चा करू आणि तुमच्या मनातील प्रश्नाच उत्तर देऊ. अधिवेशन हे पुढे ढकलले जाणार का, यावर बोलताना शिंदे यांनी सांगितले की, १८ तारखेला राष्ट्रपतीपदाची निवडणूक असल्याने अधिवेशन मागे-पुढे होऊ शकते; पण या अधिवेशनाच्या पूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल.