कागल  (प्रतिनिधी) : ‘रडणारा नव्हे लढणारा माझा कार्यकर्ता आहे, असे उद्गार आमदार हसन मुश्रीफ यांनी काढले. विरोधी पक्ष म्हणून भविष्यात रस्त्यावरील संघर्षासाठी सज्ज राहा,’ असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

कागलमध्ये कागल, गडहिंग्लज-उत्तूर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा व्यापक मेळावा उत्साहात झाला. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी मुरगूडचे माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील होते.

मुश्रीफ म्हणाले, पावणेतीन वर्षांपूर्वी ज्या दिवशी मंत्रीपदाची शपथ घेतली त्याच क्षणी दुसरी शपथ घेतली ती म्हणजे, ग्रामीण महाराष्ट्राचा किंबहुना विकासकामांच्या माध्यमातून कागल विधानसभा मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलण्याची. विकासकामांसाठी निधी देण्यामध्ये कोणतीही हयगय केली नाही. त्यामुळे दहा वर्षांत कोणतेही काम करावे लागणार नाही.

कामगार मंत्रालयाच्या माध्यमातून बांधकाम कामगारांचे कोटकल्याण करणारी योजनाही प्रभावीपणे राबवली. आंबेओहोळ प्रकल्प, नागणवाडी प्रकल्प, उचंगी प्रकल्प, काळम्मावाडी धरणाचे पाणी कालव्यातून थेट कागलच्या श्रीमंत जयसिंगराव तलावात आणणे, सेनापती कापशी येथील सरसेनापती संताजी घोरपडे यांचे ऐतिहासिक स्मारक, सुळकूडचा पूल, बसतवडे पूल ही मोठी कामे झाली आहेत, असे त्यांनी सांगितले.

आमदार मुश्रीफ म्हणाले, गोरगरीब जनतेची पुण्याई आणि आशीर्वादानेच माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला मंत्रीपदाची लागलेली ही लॉटरी होती. या सत्तेचा विकासकामे आणि जनतेसाठी पुरेपूर उपयोग केला. विरोधकांसाठी आता कोणतेही कामच शिल्लक ठेवलेले नाही.

कागल नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर, गोकुळ दूध संघाचे संचालक नवीद मुश्रीफ यांनी मनोगत व्यक्त केले. तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष विकास पाटील-कुरुकलीकर, जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, विशाल बेलवळेकर, संजय चितारी, मुरगूडचे माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील, गोकुळचे संचालक युवराज पाटील, दलितमित्र डी. डी. चौगुले, जि.प. माजी सदस्य सतीश पाटील-गिजवणेकर, मनोज फराकटे, वसंतराव धुरे शशिकांत खोत, बिद्रीचे संचालक प्रवीण भोसले, जगदीश पाटील, सूर्याजी घोरपडे, सुधीर देसाई यांच्यासह कागल, मुरगूड व गडहिंग्लज नगरपरिषदेचे पदाधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.