कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्यसभा निवडणूक निकालानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी या निवडणुकीत भाजपकडून घोडेबाजार झाल्याचा आरोप केला होता. त्यांनी बहुजन विकास आघाडीसह अपक्ष आमदार देवेंद्र भुयार आणि संजय शिंदे यांची नावे घेत हे आरोप केले आहेत. या निकालानंतर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. दरम्यान, देवेंद्र भुयार हे स्वाभिमानी पक्षाचे आमदार असल्याचा उल्लेख केल्यावरून माजी खासदार राजू शेट्टी यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

देवेंद्र भुयार म्हणाले, ‘इतक्या प्रामाणिकपणाने मत देऊन जर असे वागत असतील, तर हे कितपत योग्य आहे. मी हा विषय शरद पवारांना सांगितला आहे. मी त्यांना असा प्रसंग घडल्याचे सांगितले. आमच्यासारख्या लोकांची नावे जाहीरपणाने सांगण्यात येत असतील, तर ते फार चुकीचे आहे. या प्रकरणाबद्दल भुयार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडेही म्हणणे मांडले आहे. शरद पवारांनी मला दोन-तीन दिवसांनी भेटायला बोलावले आहे. भेटून या विषयावर चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, संजय राऊत यांनी देवेंद्र भुयार यांचा उल्लेख राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी पक्षाचा आमदार असा केल्याने राजू शेट्टी हे संतापले आहेत. त्यांनी फेसबुकवर यासंबंधी पोस्ट लिहीत स्पष्टीकरण दिले आहे. संजय राऊत यांनी ज्या आमदाराचा उल्लेख स्वाभिमानी पक्षाचा म्हणून केला आहे, त्याची पक्षातून यापूर्वीच आम्ही हकालपट्टी केली आहे, असे शेट्टी म्हटले आहे. इतकेच नाही तर या आमदाराची वागणूक कशी होती? या प्रश्नाचे उत्तर अजित पवार व जयंत पाटील यांच्याकडूनच मिळेल, असेही शेट्टी यांनी म्हटले आहे.